Tuesday, April 26, 2011

देवाची मुलाखत

स्वप्नात साक्षात ईश्वर दिसला
म्हणला माग काय मागायचे तुला
देवा एक मुलाखत द्या मला
का कलीयुगात जगाला विसरला?

तुम्हीच तर वचन दिले गीतेतून
दुष्टांच्या विनाशा याल परतून
काय मिळाले ह्या विश्वासातून?
धर्म रसातळाला चालला जगातून

अजाण आहेस तू, ईश्वर हसला
अरे माझे बोल आठवतात मला
धर्माची ग्लानी कुठे झाली म्हणायला?
पुन्हा मी धरतीवर अवतरायला

संकटात का होइना, लोक हात जोडतात
धर्माच्या नावाने दान करतात
चर्च, मशीदी, मंदीरात ध्यान करतात
तरीही धर्म बुडतोय का म्हणतात?

देवा तुम्हाला आहे सारे ज्ञात
लोक लबाड लुच्चे एकजात
मंदीर मशीदीवरून भांडतात
सज्जनांना संकटी टाकतात

धर्माच्या नांवाने खात सुटतात
धर्मासाठी जीवावर उठतात
धर्माची ग्लानी नाही असे का म्हणता?
देवा ह्या प्रकाराकडे दुर्लक्ष करता?

अरे ह्या समस्या केल्या मानवाने
आणि मानवच सोडवील शहाणपणाने
मी जन्माला घालतो सत् आणि असत् जन
त्यांची बुद्धी व आकांक्षा करतील समाधान

असल्या क्षुल्लक कामासाठी
कशाला अवतारू कुणापोटी?
मानवाची जीद्द आहे मोठी
त्यानेच उंचवावी मानवतेची गुढी

मला अवतार जर घ्यावाच लागला
तर मी म्हणीन मानव हरला
किंबहुना माझा पण पराभव झाला
कारण दुर्जनांपुढे मानव झुकला

असा भयानक प्रसंग जगभर आला
तरच मी येईल सहाय्याला
जागेन माझ्या शब्दाला
पण तुम्ही टाळा ह्या नामुश्कीला

अरे नाकर्त्यांनो, मी दिली आहे तुम्हाला
असीम शक्ती असत्याशी लढायला
रडत न बसता, करूणा न भाकता
शिका ती योग्यतेने वापरायला

जागृत ठेवा इश्वर अंतरंगातला
नाही लागणार अवताराची वाट पहायला
पळतील दुष्ट घाबरून तुम्हाला
असतील करोडो ईश्वर दुष्ट्संहाराला

ऐकूनी कठोर वाचा झोप माझी उडाली
मुलाखत आगळी ती गूढ उकलूनी गेली
ईश्वरी सुप्त शक्ती, मनुजांतरात वसते
दुष्टमर्जनाला धावून खचीत येते

गोळाबेरीज ...

असाच आज विचार करत बसलो
माझ्या आजवरच्या जीवनाचा
गोळाबेरीज मांडायला बसलो
माझ्याच आयुष्यातील शब्दफुलांचा
...बेरजेत सगळे माझ्या गोळेच गोळे आले
...कसेही सोडवले तरी,गणित माझे उणेच आले
...करू तरी काय मी,माझी काय चुक
...प्रत्येक गोष्टीला आज इथे एक नवा लुक

काल जे सोपे होते,तेच आज कठीण झाले
कठीण का झाले शोधता शोधता
आयुष्य माझे शून्य झाले.....
कळले जेव्हा शून्यातच धावतोय
अर्थच माझ्या जीवनाचे सारे तेव्हा अर्थहीन झाले
...उपदेशांच्या भडिमारांचा पिरयामिड रचला लोकांनी
...शपथेवर मला आणि अपेक्षांनाही जगवला लोकांनी
...पण साला पिरयामिड पत्त्यांचाच डोलारा निघाला
...माझ्याच खांद्यावर अपेक्षांचा तेव्हा छानपैकी'जनाजा'निघाला...
पण मित्रांनो,
तेव्हाही तिथे एक कुणीतरी नाचत होत
माझ्याच नावाने मनापासून साखर कुणी वाटत होतं
पालवीच्या पानांमागे चंद्र जेव्हा लपत होता
माझ्यासाठी कुणीतरी तेव्हा तीळ तीळ मरत होतं
...मग कळले तेव्हा मला,गणितात मी मध्यात होतो
...काही उण्या अंकाचीच बेरीज मी करत होतो
...मग म्हटले जाउदे साला,पेपरच कठीण आहे
...अजून बराच वेळ आहे,आपल्याला कुठे घाई आहे
आता मात्र ठरवलयं मी हसतच जगणार
मीही आता मनाने कुणासाठी साखर वाटणार
अश्यामध्येच मित्रांनो एक फायदा असतो
आपलं झाकून मनामध्येच सारया जगाला हसवण्याचा आनंद असतो....